- प्रशासनाच्या चुकीमुळे गावाचे झाले “वार्ड”
कुंभा बातमीदार : कैलास ठेंगणे : तालुक्यातील महसूल मंडळा अंतर्गत येणाऱ्या महादापेठ या आबाद गावाची शासकीय दप्तरात कुठेच नोंद नाही. मारेगाव तालुक्याच्या नकाशातूनच ते गावच बेपत्ता झाल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे या गावाला आता ‘वार्ड’ निहाय स्वरूप प्राप्त झाले आहे.

शंभर वर्षापूर्वीचे जुने गाव शासकीय अधिकाऱ्याच्या चुकीने कुंभा गावखंड एक, कुंभा ग्रामपंचायतीच्या प्रभागात अद्यापही समाविष्ट आहे. तालुक्यात 115 आबाद आणि उजाड गावे आहेत. उजाड गावाची सुद्धा शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र आबाद गाव असणाऱ्या महादापेठ या गावाची नोंद कुठेही आढळत नाही. कुंभा पासून पश्चिमेस तीन की. मी. अंतरावर 30 ते 35 घराच्या वस्तीला महादापेठ म्हणून ओळखतात. या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला नसल्याने या वस्तीचा समावेश कुंभा गाव व ग्रामपंचायतीच्या एका वार्डात करण्यात आला आहे.
सन 1994 पूर्वी कुंभा गावलगतचे सात कोलाम पोड व महादापेठ, कुंभा गाव आणि ग्रामपंचायतीत समाविष्ट होते. 1996 मध्ये श्रीरामपूर (रामपूर, धरम पोड, बाबई पोड) व इंदिराग्राम समाविष्ट (नगारा, गारगोटी, बंदरपोड) अशा दोन गावांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला. परन्तु महादापेठला महसुली गावाचा दर्जा मिळावा, असा कोणीच शासन स्तरावर विचार केला नाही.
कुंभा ग्रामपंचायतीचे सन 2014 मध्ये विभाजन होऊन दोन्ही स्वतंत्र महसुली गावासाठी इंदिराग्राम येथे गट ग्रामपंचायत स्थापन झाली. पण महादापेठ कुंभा ग्रामपंचायतीच्या एका प्रभागात कायम राहिले. त्यामुळे गावाचा लोकसंख्याच्या प्रमाणानुसार निधी खर्च केला जात नाही. पर्यायाने विकास कामाला प्रचंड खीळ बसली आहे. कुंभा ते महादापेठ पांदण रस्ताही बंद पडला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची चहुबाजूंनी त्रेधातिरपट उडत आहे. प्रशासनही चुप्पी साधुन असल्याने महदापेठचे शुक्लकाष्ठ संपणार की नाही हे अधांतरी आहे.