● अकृषक परवानगी शिवाय चालतो व्यवसाय
शहरातील यवतमाळ मार्गावर अनेक व्यावसायिकांनी कोळसा डेपो थाटले आहेत. चिखलगाव हद्दीत लालपुलिया परिसरातील अनेक डेपो अकृषक परवानगी शिवाय चालत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. तर बिनधास्त…PWD च्या जागेवर ‘कोलडेपो’ थाटल्याने प्रशासन नेमकं काय करतंय हा संशोधनाचा विषय आहे.

यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास शंभरच्या आसपास कोळसा डेपो आहेत. यातील शासकीय माहितीच्या आधारे केवळ 67 कोळसा डेपो अधिकृत आहेत. तर अन्य डेपो अनधिकृत आहेत का? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
यवतमाळ मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर तर एका महाशयाने बिनधास्त कोलडेपो थाटल्याची माहिती आहे. शासनाच्या जागेचा वापर आपल्या व्यवसायाकरिता होत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का बसलेत हे तपासावे लागणार आहे.
अकृषक परवानगी न घेता चालविण्यात येणाऱ्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर थाटलेल्या कोळसा डेपोवर कारवाई अपेक्षित आहे. प्रशासनाने परिसरातील संपूर्ण कोळसा डेपो बाबत माहिती संकलित करून नियमबाह्य डेपोवर तात्काळ कारवाई केल्यास ‘त्यांच्या’ बेलगाम वागण्यावर आळा बसेल.
वणी: बातमीदार