● एसटी बस लोकार्पण सोहळा वादात
● माजी आमदार बोदकुरवार यांचे परिवहन मंत्र्यांना पत्र
Big News | वणी आगाराला 5 नव्या बसेस प्राप्त झाल्या. त्या निमित्त लोकार्पण सोहळा बुधवार, दिनांक 7 मे रोजी पार पडला. या सोहळ्यादरम्यान आमदार संजय देरकर यांनी स्वतः बस चालविल्याने वाद निर्माण झाला आहे. जड वाहन चालक परवाना आणि बॅच बिल्ला नसतानाही एसटी बस चालविल्याचा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या पत्रातून केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. MLA Darekar drove the bus without a license
महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 मध्ये प्रत्येक एसटी आगाराला 10 नव्या बसेस देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने वणी आगाराला 5 नव्या बसेस प्राप्त झाल्या असून त्यापैकी एका सजवलेल्या बसला शहरातून आ. संजय देरकर यांनी चालवले. त्यांचे जवळ जड वाहन चालक परवाना आणि बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या चालवणे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे.
आ.संजय देरकर हे नोंदणीकृत एसटी चालक नसून, त्यांच्याकडे RTO कडून अधिकृत जड वाहन परवाना किंवा एसटी चालविण्याचा अनुभव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कृती फक्त प्रसिद्धीसाठी करण्यात आली आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी बस चालविल्यामुळे अपघाताचा धोका संभवत होता आणि जर काही अनुचित प्रकार घडला असता, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधीत प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, ज्या अधिकाऱ्यांनी परवाना नसलेल्या व्यक्तीस बस चालविण्यास परवानगी दिली त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार बोदकुरवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व कार्यकारी संचालक यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. या प्रकारामुळे आजी- माजी आमदारात चांगलाच कलगीतुरा रंगणार असे दिसत आहे.
Rokhthok News






