● ढाकोरी ग्रामपंचायतीच्या कारभारावर स्थानिक आक्रमक, BDO काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे…..
Wani News :
ग्रामपंचायत ढाकोरी, येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (म.रो.ह.यो.) करण्यात आलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक वामन रामचंद्र चिडे यांनी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपसरपंच तसेच सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. Locals are aggressive on the administration of Dhakori Gram Panchayat, what action will BDO take?
तक्रारीत नमूद केल्यानुसार, भूमिगत नालीचे काम प्रभाकर कोहडे यांचे घर ते अशोक सातपुते यांच्या घरापर्यंत करण्यात आले. परंतु दोन महिन्याच्या आतच हे बांधकाम उध्वस्त झाले. यासाठी निकृष्ठ दर्जाच्या मटेरियलचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय तुळशीराम काकडे यांचे घर ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत नालीचे बांधकाम अर्धवट सोडल्याने सरपंचाची कार्यक्षमता अधोरेखित होत आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड भिंतीचे काम योजनेअंतर्गत सुरु असून मजूर न घेता यंत्राच्या साहाय्याने हे काम सुरु असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. रेतीऐवजी गिट्टीच्या चुरीचा वापर केल्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
नत्थू हिरादेवे ते जीवन लोडे यांच्या शेतापर्यंत पांदनरस्त्याचे काम करताना जेसीबीचा सर्रास वापर करण्यात आला असून, प्रत्यक्षात न दिसणाऱ्या बोगस मजुरांचे बिल भरले गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही बाब फसवणुकीचा गंभीर प्रकार असल्याने कारवाई कोणावर होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ग्रामपंचायतीत पाच हजारांखालील बोगस बिले तयार करून निधीची लूट सुरू असल्याची बाब देखील तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. तसेच करपावती वसुलीची रक्कम नमुना 9 मध्ये नोंदवली जात नसल्याने लेखा शिस्तीचा भंग होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारदाराने मागणी केली आहे की, संपूर्ण ग्रामपंचायत कामकाजाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. जर बिल अदा झाले असेल तर ते वसूल करून निकृष्ट काम पुन्हा योग्य प्रकारे पूर्ण करावे. अन्यथा भविष्यात जनतेच्या पैशाची लुट अशाच पद्धतीने सुरू राहील, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत ढाकोरीतील या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणा कारवाई करतात की कारभारावर मौन बाळगतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात स्थानिकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करत आपला संताप व्यक्त केला आहे.
Rokhthok News






