
● अल्पवयीन मुलीचा केला होता विनयभंग
Rokhthok News :
वेकोली च्या उकनी खदानीतील एका अधिकाऱ्याने 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना 2019 मध्ये घडली होती. याप्रकरणी विशेष (अतिरिक्त सत्र) न्यायालयाने आरोपीस 2 वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे. The court sentenced those…..WCL officials
अजित कुमार मिश्रा (44) मूळ गाव परेणा, जि. शिवांग, बिहार, सध्या राहणार भालर न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वेकोलीच्या उकणी खदाणीत त्यावेळी कर्तव्यावर होता. 30 मार्च 2019 ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पीडिता आपल्या मैत्रिणीसह भालर वसाहतीमधील रस्त्याने शिकवणीस जात असताना आरोपीने तिचा रस्ता अडवला व अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
घडलेल्या घटनेमुळे पीडिता कमालीची घाबरून गेली व तिने शिकवणी वर्गात जाऊन रडण्यास सुरुवात केली. शिकवणीच्या शिक्षिकेने पीडितेच्या आईला व आरोपीच्या कुटुंबीयांना बोलावून घेत घटनेची माहिती घेतली. तर पीडितेच्या कुटुंबाने थेट शिरपूर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली होती.
शिरपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सतीश चावरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय दंड विधान कलम 354, 354(अ), 354 (ड), 341 व 509 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12 नुसार गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन API सतीश चावरे यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केला. सरकारी पक्षातर्फे ऍड. प्रशांत मानकर यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले. बचाव पक्षाने आरोपी घटनास्थळी नव्हता, हे सिद्ध करण्यासाठी 3 साक्षीदार सादर केले. मात्र न्यायालयाने अभियोग पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवले.
विशेष न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने 30 मे ला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधकं अधिनियमाचे तरतुदींनुसार आरोपी यास 2 वर्षाचा सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Rokhthok News