● प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विषय मांडण्याची गरज काय ? पत्रकारांच्या प्रश्नसरबत्तीने उडाली धांदल…!
BIG NEWS | गांधी चौक गाळे प्रकरणावरून वणी नगरपरिषदेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी वरिष्ठ पातळीवर केलेल्या तक्रारी व प्रकाशित झालेल्या बातम्या यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसत असल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पत्र परिषद घेतली. विरोधकांचे आरोप फेटाळून लावत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न पत्रकारांच्या प्रश्नसरबत्तीने उधळल्या गेला आहे. The ruling party’s dilemma in the Gandhi Chowk land dispute case..!
गांधी चौक परिसरातील सुमारे 160 गाळ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हा विषय न्यायप्रविष्ट आहे. यासंदर्भात उच्च न्यायालय तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाचा निर्णय अंतिम असणार आहे. तरी सुद्धा पालिका सत्ताधाऱ्यांनी विषय क्रमांक 31 मध्ये 160 गाळे धारकांना सामावून घेऊन नवीन 200 ते 300 गाळे अद्यावत सुविधेसह निर्माण करण्याचा विषय मांडला.
याप्रकरणी मुख्यधिकारी यांनी टिपणी देत, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश तसेच शासनाने यासंदर्भात अंतिमतः दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणताही ठराव अथवा निर्णय सभेत घेवू नये असे सुचवले होते. त्यानुसार कोणताही नवीन ठराव मंजूर करण्यात आलेला नसून प्रकरणाबाबत पॅनेल अधिवक्त्यामार्फत न्यायालय व शासनाला अवगत करून पुढील मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. जेव्हा ठराव घ्यायचाच नव्हता तर 160 गाळे धारकांना सामावून घेण्याचा विषय का उपस्थित करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाचे गटनेते सुधीर थेरे यांनी विरोधी सदस्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी यांचेकडे रीतसर तक्रार केली. न्यायालयीन व प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघन करून ठराव मांडणारे अध्यक्ष, सूचक व अनुमोदक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत अपात्रतेची कारवाई करावी अशी ठोस मागणी केली.
विरोधकांच्या आरोपाचे खंडन व वृत्तपत्रात तथा समाजमाध्यमात आलेल्या बातम्यामुळे भांबावलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. खोट्या तक्रारी तसेच खोट्या बातम्या प्रसारित करून वणीकर नागरिकांची दिशाभूल विरोधक करताहेत यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सत्ताधाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.
यामुळे पत्र परिषदेत पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेत विषय क्रमांक 31 मधील मुद्द्यावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. न्यायालय व शासनाला अवगत करण्यासाठी 160 गाळे धारकांना का सामावून घ्यायचे, हा निर्णय न्यायालय किंवा शासन घेईल तुम्ही याबाबत सकारात्मक का ? अशी विचारणा केली असता नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार व सत्ताधारी सदस्य अवाक झाले. विषय मांडण्याचा आततायीपणा अंगलट आल्याचे दिसताच सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगले.
Rokhthok






