● अवघ्या सहा महिन्यांत दोन महिलांच्या माध्यमातून गुन्हे दाखल…..!
Wani News :
कामगारांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवल्याचा राग मनात धरून तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे यांनी सूडभावनेतून कट कारस्थान रचल्याचा दावा करण्यात आला. तर अवघ्या सहा महिन्यांत दोन महिलांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप वेकोलीच्या अधिनस्त आयटक युनियनचे नेते सुनील मोहितकर यांनी पत्र परिषदेतून केला. The wcl labour leader was targeted out of revenge!
सुरेश घरडे हे त्यांच्या कार्यकाळात कामगारांना विविध कारणांवरून सातत्याने त्रास देत होते. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना जाब विचारण्यात आला असता त्यांनी अभद्र वागणूक दिली. या घटनेची तक्रार वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून घरडे यांनी वेकोलीच्या एक महिला कर्मचारी यांना हाताशी धरून 15 ऑक्टोबरला वणी पोलिसात तक्रार दाखल केली. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आले.
या कारवाई मुळे तब्बल 18 दिवस कारागृहात राहावे लागल्याचे मोहितकर यांनी स्पष्ट केले. या काळात शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असून समाजात झालेली बदनामी ही भरून न निघणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात वेकोलीचे तत्कालीन सब एरिया मॅनेजर घरडे यांनी समाज माध्यमातून संदेश पाठवून व भ्रमणध्वनी वरून मोहितकर यांना लक्ष्य करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचा आरोप पत्र परिषदेत करण्यात आला आहे.
अब मेरी बारी है …!
तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे आणि कामगार नेते सुनील मोहितकर यांच्यात वाद सुरु असताना 3 मार्च होळीच्या दिवशी घरडे यांनी मोहितकर यांच्या व्हॉट्सॲप वर ”अब मेरी बारी है, बुरा न मानो होली है” असा संदेश पाठवून अप्रत्यक्षरित्या धमकावल्याचा आरोपही सुनील मोहितकर यांनी केला आहे.
दरम्यान, 17 मार्चला ऍड. सोनिया अमृत गजभिये यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात चाकू हल्ल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तक्रारीतील नमूद वेळेत निवली (ता. वणी) येथील घराच्या बांधकामस्थळी उपस्थित असल्याचे पुरावे पोलिसांना सादर केल्याचा दावा मोहितकर यांनी केला आहे. त्यामुळे ही तक्रारही बनावट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
ऍड. गजभिये या ज्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत, ते घर वेकोलीचे अधिकारी सुरेश घरडे यांना देण्यात आले होते. यामुळे त्यांच्यात नेमके काय नातेसंबंध आहेत हे माहीत नसल्याचे मोहितकर यांनी स्पष्ट केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये साम्य असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, कथित हल्ल्यावेळी परिसरात वर्दळ असतानाही मदतीला कोणीच न आल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे मोहितकर यांनी सांगितले तसेच दोन्ही प्रकरणातील सबळ पुरावे व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन न्यायालय जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे मोहितकर यांनी सांगितले.
Rokhthok






