● मारेगाव पोलिसांची आणखी मोठी कारवाई
Crime News : मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंडगाव शिवारातील मार्डा धरणाजवळ विनोद प्रल्हादराव सहारे (35), रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर याची हत्या करण्यात आली होती. संशयास्पद मृत्यू असल्याचे लक्षात आल्यानंतर तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यात तीन आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक केली होती, तर तांत्रिकदृष्ट्या तपास करत पुन्हा दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आता आरोपींची संख्या पाच झाली आहे. Two more accused in the murder case arrested
प्रशांत उर्फ परशु उर्फ ठमकेश्वर पंढरी घागी (20), रा. पावणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, कार्तिक सुनील निकोडे (19), रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर असे नव्याने अटकेतील दोन संशयितांची नावे आहेत. याच प्रकरणात मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात तिघांना ताब्यात घेतले होते.
या खूनप्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय मारेगाव पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. त्यानुसार पोलिसांनी समांतर तपास सुरू ठेवत तांत्रिक माहितीच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध घेतला. अखेर त्यांच्या हालचालींचा माग काढून संशयित असलेल्या दोघांनाही त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, शंकर बारेकर, पोलीस शिपाई सागर दीपेवार आणि संभा लेणगुरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत असून, खुनामागील संपूर्ण कट, कारणे आणि इतर संबंधित बाबींचा शोध घेतला जात आहे.
ROKHTHOK






