● मारेगाव पोलिसांची कारवाई, दोन वाहनांसह गोवंश ताब्यात…
ROKHTHOK | प्राण्यांशी क्रूरतेने व अमानुष पद्धतीने गोवंश वाहतूक करणाऱ्या तिघांविरोधात मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन वाहनांसह गोवंश असा सुमारे 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Crime against three people involved in cattle smuggling
मारेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौराळा शिवार परिसरात 25 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विठ्ठल लक्ष्मण वागदरकर रा. राजीव गांधी वार्ड, वरोरा, रत्नाकर मारोती वाकुळकर रा. टाकळी डोगरगाव रेल्वे, ता. वरोरा व शनिदेवा शिवशंकर पांडे रा. आझाद वार्ड, वरोरा यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नमूद केल्यानुसार, आरोपी हे अशोक लेलँड क्रमांक MH- 34- BZ- 8489 व महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH- 34- AV- 1037 या वाहनांमधून चार बैलांची वाहतूक करीत होते. तब्बल 43 ते 45 अंश तापमान असताना जनावरांना अत्यंत आखूड पद्धतीने बांधून वाहनात कोंबण्यात आले होते. तसेच वाहनांवर कोणतेही आच्छादन नव्हते आणि चारापाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे गोवंशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोन्ही वाहने व गोवंश असा एकूण 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके, पोलीस शिपाई सागर दिपेवार व नरेंद्र तुमराम पुढील तपास करीत आहेत






