नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई

वणी बातमीदार: मागील वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाने कोविड त्रिसूत्री चे नियम आखून दिले आहे. त्यामुळे सण उत्सवालाही मर्यादा आल्या आहेत. त्याप्रमाणेच गणेशमूर्ती बाबत नियमावली तयार केली आहे. नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगरण्यात येणार असून ठाणेदार वैभव जाधव यांनी परिसरातील मूर्तिकारांना सूचना पत्र पाठवून ‘तंबी’ दिली आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. यावर्षी गणेशमूर्तीच्या उंचीसाठी प्रशासनाने नियम आखून दिले आहेत. सार्वजनिकरीत्या स्थापन करण्यासाठी केवळ 4 फूट उंचीची मूर्ती तयार करावी तसेच घरगुती मूर्तीची उंची 2 फुटापेक्षा अधिक नसावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व मूर्ती केवळ मातीपासून तयार केलेल्या असाव्यात तसेच पीओपीच्या मूर्तीवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. नियमबाह्य गणेशमूर्तीची निर्मिती केल्यास अथवा विक्री करताना आढळल्यास त्याची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल व संबंधिताविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार वैभव जाधव यांनी दिला आहे.