◆पालिकेचा प्रदूषणमुक्तीचा संकल्प
वणी:- गणेशोत्सवात मातीच्याच मूर्तीची निर्मिती ही चळवळ नावारूपास आली. हे खरे असले तरी आकर्षक मूर्ती निर्माण करताना वापरण्यात येत असलेले रासायनिक रंग मूर्तीच्या विसर्जनादरम्यान पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. यासाठी पालिकेने प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत नदीपात्रालगत कलश निर्माण केले आहे. या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पुढाकार घेतला आहे.

धार्मिकदृष्ट्या उत्तरपूजेनंतर गणेशाची मूर्ती ही वाहत्या पाण्यात विसर्जित करावी असे मत शहरात कायम आहे. पूर्वीच्या मूर्ती मातीच्या व नैसर्गिक रंगाने रंगविल्या जात होत्या. यामुळे मूर्ती नदीत विसर्जित केल्यानंतर पाण्यात मूर्त्यांचे सहज विघटन होते. परंतु, कालांतराने मूर्ती निर्माण करताना प्लॉस्टर ऑफ पॅरिसचा वापर होऊ लागला. सोबतच आकर्षक मूर्ती निर्माण करताना नैसर्गिक रंगाना डावलून रासायनिक रंगाचा वापर सुरू झाला.
अशा मूर्ती नदीत विसर्जित केल्यानंतर पाण्यात प्रदूषण होत असल्याने याचा विपरीत परीणाम मानवी आरोग्यासह जनावरांच्या आरोग्यावरही होत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे पालिकेने शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता नदीपात्रालगत तीन ठिकाणी मोठे कलश निर्माण केले. या करिता प्रभारी आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद व त्यांचे कर्मचारी कार्यरत आहे. या कलश मधेच श्रीचे विसर्जन करून प्रदूषण रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना पालिकेने केले आहे.