* भाजपा नगरसेवकाच्या प्रभागात काँगेसचा पक्षप्रवेश सोहळा
तुषार अतकारे-
अवघ्या 3 – 4 महिन्यांवर नगर पालिकेची निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. पक्षप्रवेशाचे सोहळे घेतल्याजात आहे, यामध्ये काँग्रेस हा पक्ष आघाडीवर दिसत असून भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातच पक्षप्रवेश सोहळा होत असल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

पालिकेची येणारी नगर निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. वणी नगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असल्याने त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न इतर राजकीय पक्षाचा असणार आहे. याकरिता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला आपल्या जाळ्यात ओढण्यात काँग्रेस यशस्वी झाला आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात काँग्रेसने आपले जाळे विणायला सुरवात केली आहे. खंबीर व कट्टर कार्यकर्त्यांच्या शोधात काँग्रेसचे पदाधिकारी गुंतले आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे.
शहरातील प्रभाग क्र 5 या मध्ये भाजपचे वर्चस्व असून येथे दोन्हीही नगरसेवक भाजपचे आहे. तसेच याच प्रभागात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे निवासस्थान आहे. यापूर्वी या प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र मागील झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने काँग्रेसला शह दिला होता. आता तो प्रभाग आपल्या कडे ओढण्याकरिता काँग्रेस सरसावली असून 300 कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळाच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाची यापुढील रणनीती कशी असणार याकडे लक्ष लागले आहे.