Home Breaking News आर पार……मनसेचा शिंदे-फडणवीस सरकार विरोधात ‘एल्गार’

आर पार……मनसेचा शिंदे-फडणवीस सरकार विरोधात ‘एल्गार’

517

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा

रोखठोक | वर्षभरात विदर्भात दीड हजारच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ओला दुष्काळ असूनंही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली तर दिवसा वीज मिळत नसल्याने रब्बी हंगामंही संकटात असताना राज्य सरकार निद्रिस्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी मनसेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन करून सरकार विरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे.

लहरी निसर्गामुळे खरीपांचा हंगाम नेस्‍तनाबुत झाला, रब्‍बीवर कसंतरी तग धरुन असलेला शेतकरी वीज पुरावठ्याअभावी मेटाकुटीला आला आहे. लगतच्या जिल्ह्यात 24 तास मिळणारी वीज आणि येथे सावत्रपणाची वागणूक असा दुटप्पीपणा का असा सवाल मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे – फडणवीस सरकारशी मनसेची जवळीकता वाढत असल्याची चर्चा होत असतानाच विदर्भात प्रथमतः शेतकरी हितासाठी शुक्रवारी भव्य “आर या पार” मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली नाही तर “खळखटयाक” हा शेवटचा पर्याय निवडावा लागेल असा इशारा उंबरकर यांनी दिला आहे.

विदर्भातील कास्तकार अतिशय त्रस्त आहेत अशा स्थितीत सरकारने ठोस पावलं उचलली नाही तर विदर्भात आणखी हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधीक भीषण आहे” त्यामुळेच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘आर पार’मोर्चा काढत असल्याचं मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी स्पष्ट केले.
वणी : बातमीदार