● दहा हजाराची लाच मागणे भोवले
● यवतमाळ एसीबी (ACB)ची कारवाई
रोखठोक |: शेतीच्या मोजणी मध्ये त्रुटी दाखवून दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्याने याबाबत यवतमाळ लाच लुचपत विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. रविवार दि. 26 फेब्रुवारीला सायंकाळी येथील एका हॉटेलात रचलेल्या सापळ्यात भूमी अभिलेख विभागाचा भूमापक (Surveyor) रंगेहात जाळ्यात अडकला.
के. एम. कवडे असे अटकेतील लाचखोर भूमापकाचे नाव आहे. ते येथील भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक म्हणून कर्तव्यावर होता. पुरड येथील शेतकरी दिलीप रामदास भोयर यांना शेताची मोजणी करायची होती. नियमानुसार भूमी अभिलेख विभागात सर्व पूर्तता करण्यात आली होती.

मोजणी करण्यासाठी भूमापक कवडे हे वेळोवेळी पुरड येथे गेले. परंतु ते त्रुटी काढून मोजणी शीट देण्यास टाळाटाळ करत होते. तसेच शेतकरी भोयर यांना 12 हजार रुपयांची मागणी करत होते. तडजोडी नंतर 10 हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या भोयर यांनी ACB कडे रीतसर तक्रार दाखल केली.
रविवारी मोजणी आटोपल्यावर भूमापक व तक्रारदार वणीतील नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेल मध्ये जेवायला गेले. ठरल्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी वृत्त लिहे पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वणी: बातमीदार