● आमदार देरकर यांच्या प्रयत्नाला यश
Rokhthok : वणी शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बसस्थानक नूतनीकरणाच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून, आमदार संजय देरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने 8 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वणी बसस्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. The face of the bus stand will change, a fund of Rs 8 crores has been approved.
वणी हे मतदारसंघाचे केंद्रस्थान असून व्यापार, उद्योग व शिक्षणासाठी महत्त्वाचे शहर मानले जाते. परिसरातील कोळसा खाणी तसेच विविध उद्योगांमुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. याशिवाय, ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी वणी येथे ये-जा करत असल्याने एसटी बससेवा ही त्यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरते.
मागील काही वर्षांपासून बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. अस्वच्छता, मोडकळीस आलेली इमारत आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर निधीतून बसस्थानकाची सुसज्ज व आधुनिक इमारत उभारण्यात येणार असून, प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच अद्ययावत स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. नूतनीकरनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने वणीकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
Wani News






