●वेकोलीची कोळसा वाहतूक दोन तास ठप्प ●इरशाद खान यांचा आक्रमक पवित्रा
Rokhthok : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली)च्या वणी नॉर्थ एरियातील बेकायदेशीर व जीवघेणी कोळसा वाहतूक अखेर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने रस्त्यावर उतरून उजागर केली. मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तब्बल दोन तास कोळसा वाहतूक ठप्प झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. MNS’s blow! Unfit, overloaded vehicles busted
इरशाद खान यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मोटार वाहन अधिनियम 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे सर्रास उल्लंघन करत ही वाहने धावत असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ट्रक अनफिट, भंगार अवस्थेत असूनही रस्त्यावर धावतात, तर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोडिंगचा सुळसुळाट सुरू असल्याचेही उघड झाले.
यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे, स्थानिक आरटीओ विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आहे. “वाहतूकदार आणि अधिकाऱ्यांमधील आर्थिक साटेलोटेमुळेच या जीवघेण्या प्रकाराला खतपाणी मिळत आहे,” असा थेट आरोप इरशाद खान यांनी करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला.
या बेकायदेशीर वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराविरोधात मनसेने उग्र भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
आंदोलनाची तीव्रता वाढताच वेकोलीच्या सब एरिया व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या दबावानंतर वेकोली प्रशासनाने दोषी वाहनांवर कारवाईसाठी विहित मुदत मागितली आहे.
दरम्यान, “निर्धारित वेळेत कारवाई झाली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देत इरशाद खान यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. वणी परिसरात आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Wani News






