● निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे…..
ROKHTHOK |: महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील रहिवासी तथा सध्या पुसद येथे वास्तव्यास असलेले ॲड. सचिन विश्वासराव नाईक यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. Rahul Brigade’s Adv. Sachin Naik is the District President of Congress.
राहुल गांधी यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या “राहुल ब्रिगेड”चे खंदे कार्यकर्ते म्हणून ॲड. सचिन नाईक यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी गेल्या 18 वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. युवक काँग्रेस, NSUI तसेच संघटन उभारणीच्या विविध स्तरांवर त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.

प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीय संघटनांवर काम करताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी पक्षात मजबूत स्थान निर्माण केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या “संगठन सृजन अभियान” अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधून लोकशाही पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा आणि प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव यामुळे ॲड. सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि सक्षम नेतृत्व मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






