Home Breaking News अवजड ट्रक पलटी, जीवितहानी टळली

अवजड ट्रक पलटी, जीवितहानी टळली

● मृत्यूचा सापळा बनला मार्डी रस्ता, अपघाताची शृंखला सुरूच, PWD चा निष्काळजीपणा अधोरेखित, शिवसेनेचे संजय आवारी संतप्त.....

C1 20260519

मृत्यूचा सापळा बनला मार्डी रस्ता, अपघाताची शृंखला सुरूच, PWD चा निष्काळजीपणा अधोरेखित, शिवसेनेचे संजय आवारी संतप्त…..

ROKHTHOK | मार्डी जवळील भोंगळे यांच्या शेतालगतचा रस्ता आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) निष्क्रियतेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. चंद्रपूरवरून अमरावतीकडे सरकी भरून जाणारा ट्रक आज पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असला तरी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. Heavy truck overturns, no casualties

मात्र, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी वनोजा देवी येथील ऑटो पलटी होऊन भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे ते जखमी आजही मृत्यूशी झुंज देत असून उपचार घेत आहेत. तरी देखील संबंधित विभागाला जाग आलेली नाही.

IMG 20260511 WA0005

स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरातील धोकादायक वळण, रस्त्याची खराब रचना, अपुरी सुरक्षा भिंत, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. अनेकांनी याबाबत तक्रारी करूनही प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप होत आहे.

Img 20250103 Wa0009

शिवसेनेचे संजय आवारी यांनी या अपघात प्रवण क्षेत्राबाबत अनेकवेळा शासन व PWD विभागाला लेखी आणि तोंडी सूचना दिल्या होत्या. यापूर्वीही अनेक नागरिकांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

“प्रशासनाला आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी हवे आहेत? मोठी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिकांनी या मार्गावर तातडीने सुरक्षा कठडे, इशारा फलक, रस्ता रुंदीकरण आणि वेग नियंत्रण उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बातमीदार

    Previous articleबापरे..महिलेच्या गळ्यावर सपासप वार.!
    Rokhthok News
    वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.