● SDO च्या ‘त्या’ पत्राने महसूलची कार्यपद्धती उजागर, ठाणेदारावर दबाव कोण टाकतोय….
ROKHTHOK | वणी शहरालगतच्या वडगाव (धंदीर) येथील भूखंड विक्री प्रकरणात बनावट दस्तावेज तयार करून आर्थिक फसवणूक करण्यात आली. यात तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसह अन्य दोघे आरोपींच्या पिंजऱ्यात असताना पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ होत होती. तर चक्क SDO यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हाच नोंद करू नये असे पत्र दिल्याने महसूलची कार्यपद्धती उजागर होत आहे. येनकेन प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या मस्तवाल अधिकाऱ्यांना पाठबळ कुणाचे..! असा प्रश्न उपस्थित होत आहे. Whose support is that for the officials?
शैलेश दादाजी वाकडे राहणार बाबुपेठ, चंद्रपूर, अर्जनवीस सतीश पुंडलीकराव केराम ओमनगर, चिखलगाव, तत्कालीन तलाठी रविंद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्यावर भूखंड विक्रीसाठी खोटे दस्तावेज तयार करून व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांचेवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336(3), 340(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार पत्रकार सूरज रमेश चाटे आणि संध्या संजय तरवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2024 मध्ये वडगाव (ध.) येथील गट क्रमांक 15/1-अ मधील प्लॉट क्रमांक 30 खरेदीचा व्यवहार करण्यात आला होता. संबंधित कागदपत्रे वैध असल्याचे सांगून आरोपींनी व्यवहार पूर्ण केला. यासाठी तक्रारदारांकडून एक लाख वीस हजार रुपये धनादेशाद्वारे स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर फेरफार नोंदणी व सातबारा उताराही तक्रारदारांच्या नावाने करण्यात आला.
मात्र पुढील चौकशीत संबंधित भूखंडाचा मूळ मालक दुसराच असल्याचे समोर आले. तसेच फेरफार क्रमांक 1539 हा बनावट असल्याचेही उघडकीस आले. यानंतर तक्रारदारांनी महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि वणी पोलीस ठाण्याकडे वारंवार तक्रारी दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती असतानाही स्थानिक पातळीवर कारवाई होत नव्हती.
दरम्यान, पत्रकार सूरज चाटे यांनी प्रकरणाची माहिती स्थानिक पत्रकारांना दिल्यानंतर शुक्रवारी सुमारे 20 ते 25 पत्रकारांनी वणी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या कार्यालयासमोर चटई टाकून पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यातही ठाणेदार द्विधा मानसिकतेत वावरत होते तर महसूल अधिकारी विवेक पांडे त्या कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत होते. जमलेले पत्रकार उग्र होत असतानाच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ठाणेदार व महसूल अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
पत्रकारालाच अधिकारी जुमानत नसेल तर सर्वसामान्य नागरीकांची काय अवस्था असेल. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झालेत मात्र आरोपींना अद्याप अटक झाली नाही आणि होणारही नाही असे दिसते आहे. त्यातच महसूल कर्मचारी ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ उतरणार असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु या प्रकरणी आजी- माजी आमदार पत्रकाराच्या बाजूने असताना ‘त्या’ मस्तवाल अधिकाऱ्यांना पाठबळ कुणाचे..! हा संशोधनाचा विषय झाला आहे.






