● पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तीन आरोपी जेरबंद….
Crime News | ROKHTHOK | दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात आढळून आलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. त्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले. पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. He…troubled his sister, three people beat him up…!
दांडगाव येथील गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या जंगलातील खड्यात 5 जून रोजी एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला.
प्रारंभी मृताची ओळख पटत नसल्याने मर्ग दाखल करून तपास सुरू होता. संशयास्पद मृत्यू असल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावात चौकशी केली असता मृताची ओळख विनोद प्रल्हादराव सहारे (35), रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर अशी पटली.
प्रविण अशोक वरधने (35) रा. आपटी, राजू नथ्थुजी ढेंगळे (35) रा. दांडगाव आणि शंतनू झाडे (18) रा. नागरी, ता. वरोरा यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतक हा प्रविण वरधने याच्या बहिणीला वारंवार त्रास देत होता. याच रागातून तिघांनी संगनमत करून 3 जून रोजी विनोद सहारे याला वरोरा रेल्वे स्टेशनवरून मोटारसायकलवर बसवून मार्डा डॅम परिसरात नेले आणि त्याची हत्या करून मृतदेह जंगलातील खड्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे, शिरपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके, इकबाल शेख, राजन इसनकर, सागर दीपेवार, अजय वाभिटकर शिरपूर व मारेगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या पार पाडली.






