● महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न, परिसरात पसरली शोककळा….
ROKHTHOK | मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित पती-पत्नीने गावालगतच्या शेतातील विहिरीत पोटाला दगड बांधून उडी घेतली आणि आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. Newlywed couple jumps into well with stone tied to their stomach
प्राप्त माहितीनुसार, करिश्मा व आशीष धानोरकर यांचा विवाह दिनांक 4 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर दोघेही कुटुंबासोबत राहत होते. मात्र, रविवारी 7 जूनला रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य मोटारसायकलने घरातून बाहेर पडले.
यानंतर गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत दोघांनीही उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी आपल्या पोटाला दोरीच्या सहाय्याने दगड बांधून विहिरीत उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार शाम वानखेडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सगणापूरसह संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
Sad News :






