● 16 वर्षांनंतर पिदूरकरांच्या पुनरागमनाने चर्चांना उधाण… !
ROKHTHOK |
वणी पोलीस ठाणे हे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. नव्याने वणी पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या पुनरागमनामुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. तब्बल 16 वर्षांपूर्वी PSI म्हणून वणीत कार्यरत असलेले पिदूरकर पुन्हा याच ठाण्यात दाखल झाल्याने “वणीत असे आहे तरी काय ?” हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. Why do officers and employees want Wani Police Station, what is the real attraction..!
यापूर्वी शिरपूर येथे API म्हणून कार्यरत असलेले मुकुंद कुलकर्णी यांनी पदोन्नतीनंतर अमरावती परिक्षेत्राबाहेर बदली घेतली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी वणीत ‘कमबॅक’ केले होते. त्याच धर्तीवर पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्याही पुनरागमनाची चर्चा शहरात चांगलीच ‘ट्रेंडिंग’ होतांना दिसत आहे.
वणी, शिरपूर, मारेगाव, मुकूटबन आणि पाटण या उपविभागातील पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर विशेष आव्हाने असतात का ? तर अजिबात नाही. ते येतात, कार्यकाळ पूर्ण करतात आणि जातात. मात्र कारभाराची पद्धत आणि परिस्थिती मात्र बदलत नाही. नेहमीच येणाऱ्या अधिकाऱ्यासमोरील आव्हाने आम्ही मांडतो परंतु ती आजपर्यंत पूर्णत्वास गेलेली नाही किंबहुना त्याचे उच्चाटन झालेलं नाही.
विशेष म्हणजे, केवळ अधिकारीच नव्हे तर अनेक पोलीस कर्मचारीदेखील वणी सोडण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येते. अनेकांनी येथेच दीर्घकाळ सेवा बजावत ‘तपपूर्ती’ केली आहे. त्यामुळे वणी पोलीस ठाण्याची ‘मलाईदार’ ओळख आजही जिल्ह्यात कायम असल्याची चर्चा रंगत आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील विविध भागांतून अधिकारी वणीत दाखल झाले आहेत. कराडमार्गे मुंबईहून PI उदयसिंग डुबल, नाशिकहून PI गुलाबराव वाघ, मुंबईहून PI बाळासाहेब खाडे, नवी मुंबईतील PI अनिल बेहराणी तसेच नागपूरमार्गे यवतमाळ आणि नंतर वणीत आलेले PI वैभव जाधव यांची नियुक्ती याचे उदाहरण मानले जाते.
मात्र दुसरीकडे, वणी परिसरातील गुन्हेगारी, अवैध धंदे, गुटखा-तंबाखू तस्करी, गोवंश तस्करी, मटका-जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू तस्करी आणि कोळसा चोरी यांसारख्या अवैध व्यवसायावर अद्याप कोणत्याही ठाणेदाराने प्रभावी नियंत्रण ठेवले नाही याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
वणी पोलीस ठाणे राज्यभर चर्चेत असले, तरी सर्वसामान्य वणीकरांना अपेक्षा आहे ती गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित शहराची. नव्यानेच वणी पोलीस ठाण्याचा प्रभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर आणि त्यांच्या अधिपत्यातील कर्मचारी या अपेक्षा कितपत पूर्ण करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






