●जिल्हा बँक निवडणुकीत देरकर, कातकडे यांचा दणदणीत विजय
Rokhthok News :
A blow to the Wani-Maregaon power equation! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुका गटातील निकालांनी स्थानिक राजकीय समीकरणांचे लक्ष वेधून घेतले आहे. वणी तालुका गटातून अपक्ष उमेदवार सुनील कातकडे यांनी माजी बँक अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे आणि महायुतीचे उमेदवार दीपक मत्ते यांचा पराभव करत विजय मिळविला. मारेगाव तालुका गटातून किरण देरकर यांनी विजय संपादन केला.
रविवार, दिनांक 11 ऑक्टोबरला वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा बँकेच्या संचालक निवडीसाठी मतदान पार पडले. बँकेच्या 25 संचालकांच्या निवडीच्या प्रक्रियेंतर्गत वणी तालुका गटातील सर्व 68 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वणी तालुका गटातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुनील कातकडे यांनी सुरुवातीपासून नियोजनबद्ध रणनीती आखत प्रचार केला. या निवडणुकीत त्यांनी माजी बँक अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे आणि महायुतीचे उमेदवार दीपक मत्ते यांना पराभूत केले. प्रस्थापित राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कातकडे यांचा विजय काँग्रेस व भाजपा साठी जबर धक्का मानला जातो.
मारेगाव तालुका गटात आमदार संजय देरकर यांच्या सौभाग्यवती किरण देरकर यांनी विजय मिळवत आपले स्थान अधोरेखित केले. दुसरीकडे, झरी-जामणी तालुका गटातून महाविकास आघाडीचे राजीव येल्टीवार यांनी विजय नोंदविला. ते यापूर्वी सुध्दा बँकेचे संचालक होते.
या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही प्रकर्षाने समोर आल्याचे चित्र दिसून आले. मारेगाव तालुक्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या बाजूने भूमिका घेतली, तर वणी तालुका गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे अपक्ष उमेदवारांची पाठराखण केल्याचे समोर आले.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीने केवळ संचालकांची निवड केली नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समन्वय, पक्षांतर्गत मतभेद आणि नेत्यांच्या प्रभावाचीही चर्चा सुरू केली आहे. वणी, मारेगाव आणि झरी-जामणी गटातील या निकालांचे जिल्हा बँकेच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे आता सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






