● काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह, आत्मपरिक्षणाची वेळ…..
ROKHTHOK :
The ‘secret’ of Tikaram Kongre’s defeat..! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वणी तालुका गटातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या झालेल्या पराभवाचे ‘रहस्य’, राजकीय दृष्टया चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची परंपरागत पकड आणि सहकार क्षेत्रातील पक्षाचे प्राबल्य लक्षात घेता, कोंगरे यांना अवघी नऊ मते मिळणे हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नसून काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल मानला जात आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने अनेक वर्षे राजकीय वर्चस्व गाजवले. ग्रामीण भागातील गावपातळीवर आजही काँग्रेसच्या विचारांना मानणारा मतदारवर्ग अस्तित्वात आहे. सहकार क्षेत्रातही पक्षाचे सातत्याने प्राबल्य राहिले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांना मतदारांचा एवढा अत्यल्प प्रतिसाद मिळणे अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे.
काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांनी त्यावेळी पक्षश्रेष्ठींपुढे केलेल्या आग्रहामुळे टीकाराम कोंगरे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमुळे कोंगरे यांचे सहकार क्षेत्रातील राजकीय महत्त्व वाढले होते. मात्र, त्यांच्या या उदयामुळे काँग्रेसमधील पहिल्या-दुसऱ्या फळीतील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती का, हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे.
यंदाच्या निवडणुकीतील निकालाने या चर्चेला अधिक धार दिली आहे. अधिकृत उमेदवारी मिळूनही कोंगरे यांना अपेक्षित पाठिंबा का मिळाला नाही? पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रत्यक्षात किती ताकद लावली हा प्रश्न उपस्थित होतोय. पक्षाचे नेते प्रचारात तनाने सोबत होते, मनाने सोबत होते का ? हे प्राप्त मतावरून सिद्ध होत आहे.
काँग्रेसचा पारंपरिक मतदारवर्ग, ग्रामीण भागातील पक्षाची स्थिती आणि सहकार क्षेत्रातील संघटनात्मक जाळे या बाबी लक्षात घेतल्या, तर कोंगरे यांना मिळालेली नऊ मते ही पक्षाची ‘दिवाळखोरी’ सिद्ध करते. हा निकाल केवळ मतदारांनी उमेदवाराला नाकारल्याचा नाही. पक्षांतर्गत कुरघोडी करून भविष्यातील आपला राजकीय स्वार्थ शोधण्याचा तर काहींचा प्रयत्न नाही ना हे शोधण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे.
काँग्रेसच्या राजकारणात अंतर्गत गटबाजी आणि परस्परविरोधी हितसंबंध हे नवे नाहीत. अनेकदा विरोधकांशी लढण्याआधी पक्षांतर्गत संघर्षालाच सामोरे जावे लागते. कोंगरे यांच्या पराभवामागेही अशीच काही समीकरणे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु सहकार क्षेत्रातील निवडणुका आता केवळ पक्षनिष्ठेच्या जोरावर जिंकल्या जात नाहीत. त्या आता “आत्मनिर्भर” झालेल्या आहेत. जसे नेते तसे मतदार वागताहेत.
कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी असते, मग कोंगरे पराभूत का झाले. याचे आत्मपरीक्षण काँग्रेसने करणे गरजेचे आहे. पडद्यामागील राजकीय हालचाली यांचाही निकालावर प्रभाव पडतो. त्यामुळे कोंगरे यांच्या पराभवाची कारणे शोधताना या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे.
मात्र, अधिकृत उमेदवाराला पक्षातील सर्व घटकांचा प्रभावी पाठिंबा मिळाला होता का, हा प्रश्न काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. निवडणुकीत विजय मिळवणे हेच उद्दिष्ट असेल, तर उमेदवारी जाहीर करण्यापासून मतदानापर्यंत पक्षयंत्रणेने एकदिलाने काम करणे अपेक्षित आहे.






