
● मैत्रेयी ठाकरेची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड
Wani News :
वणी तालुक्याची शान ठरलेली स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता नववीतील विद्यार्थीनी मैत्रेयी संदीप ठाकरे हिने अभिमानास्पद भरारी घेतली आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि विज्ञानातील आवडीच्या जोरावर नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड मिळवली आहे. Proud…Wani’s daughter on her way to ISRO!
नोबेल फाउंडेशन व भवरलाल अँड कांतीलाल फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रतिष्ठेची परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन, ऑफलाइन आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून पार पडणाऱ्या या कठीण स्पर्धेत राज्यभरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी मैत्रेयी ठाकरेंनी इयत्ता आठवी ‘ब’ गटात राज्यस्तरावर अकरावा क्रमांक पटकावत आपली प्रतिभा सिद्ध केली.

या यशामुळे तिची जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून, या दौऱ्यात ती “इस्रो” अहमदाबाद, आयआयटी गांधीनगर यांसह देशातील बारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रांना भेट देणार आहे. या अनुभवातून विज्ञान क्षेत्रातील तिची जिज्ञासा आणि आवड अधिक बहरणार आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. रेड्डी तसेच प्राचार्या अन्नपूर्णा पवन मॅडम यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“विज्ञान म्हणजे फक्त विषय नव्हे, तर शोध घेण्याची आणि जाणून घेण्याची प्रेरणा आहे. इस्रोला भेट देणे म्हणजे माझ्या स्वप्नांना पंख मिळण्यासारखे आहे.” असे मैत्रेयी हिने स्पष्ठ केले, तिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवर्ग आणि आई-वडील यांना दिले.
वणीच्या या चिमुरडीने संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून, तिच्या यशाने गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. वणीच्या मातीतील ही नवोदित तारका भविष्यात खऱ्या अर्थाने देशासाठी विज्ञान क्षेत्रात तेज पसरवेल, अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
Rokhthok






