●विदर्भात तापमानाचा कहर, रस्त्यावर शुकशुकाट, नागरिकांनी सावधानता बाळगावी…
Rokhthok | विदर्भात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून एप्रिल महिन्यातच मे महिन्याची तीव्रता अनुभवायला मिळत आहे. रविवारी विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः हैराण झाले आहे. वणी शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असून वातानुकूलित सामुग्री कुचकामी ठरताहेत. The sun is burning! ‘May’ hits in April itself
रविवारच्या नोंदीनुसार, विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 47°C तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूरमध्ये 44°C पर्यंत पारा पोहोचला. नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या शहरांमध्येही तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली आहे.
झपाट्याने तापमानात झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे असून जास्तीत-जास्त शुद्ध पाणी प्यावे, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत उन्हात जाण्याचे टाळावे, शीतपेय, लिंबू सरबत सेवन करावे, उन्हात जायचे काम पडल्यास दुपट्टा, टोपी वापरणे गरजेचे आहे. या दरम्यान अस्वस्थता जाणवल्यास किंवा ताप, उलटी, मळमळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
डॉ. गणेश लिमजे
सुगम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वणी
उष्णतेच्या या लाटेमुळे विदर्भात पारा चांगलाच चढलाय. सूर्य आग ओकतोय. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस तापमान जैसे-थे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
-बातमीदार-






