●अवघ्या तासाभरात तिघांना अटक
CRIME NEWS :
एलसीबीचे पोलीस असल्याचे भासवून मारहाण व खंडणी उकळणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना मारेगाव पोलिसांनी अवघ्या एका तासात सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केल्याची थरारक कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. आरोपींकडून टाटा कंपनीची नेक्सॉन चारचाकी कार क्रमांक MH-32-AX-6254 जप्त करण्यात आली आहे. Maregaon police take cinestyle action
याप्रकरणी मंगेश दिलीप मेश्राम (30) रा. लाखापूर, यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मंगेश मेश्राम व त्यांचा मित्र वर्धा नदीवरून आंघोळ करून वनोजादेवी मंदिर बसस्टॉपजवळील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते.

यावेळी पांढऱ्या रंगाच्या टाटा नेक्सॉन कारमधून तीन इसम उतरले व खुर्चीवर आडवे पाय करून बसले. यावर ‘सरळ बसा, इतरांनाही बसायला जागा मिळेल’ असे म्हटल्याचा राग धरून त्या तिघांनी ‘आम्ही एलसीबीचे पोलीस आहोत’ असे सांगत मेश्राम यांना थपडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भीतीपोटी मंगेश मेश्राम हे आपल्या लाखापूर येथील घरी पळाले असता, आरोपींनी कारने पाठलाग करून त्यांच्या घरी जाऊन वडिलांना धमकावले. ‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्या मुलावर कारवाई करू, नाहीतर पैसे देऊन सेटलमेंट करा’ अशी दमदाटी करत आरोपींनी एक हजार पाचशे रुपये उकळले. नंतर हे तिघे तोतया पोलीस असल्याचे लक्षात येताच मंगेश मेश्राम यांनी उशिरा रात्री 11:30 वाजता मारेगाव पोलीस ठाण्यात जबानी रिपोर्ट दाखल केला.
हर्षल रामेश्वर ठाकरे (38) रा. आर्वी नाका वर्धा, हरीष कैलासराव ठाकरे (34) ) रा. रामनगर, वर्धा व अनंता अजाबराव धोटे (39) रा. तिरझडा, ता. कळंब, जि. यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी वणी–मारेगाव मार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करत मार्डी चौकात नाकाबंदी केली. अवघ्या एका तासाच्या आत आरोपींना कारसह ताब्यात घेत अटक करण्यात आली.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204, 318, 115(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके व पोलीस कॉन्स्टेबल सागर दीपेवार करीत आहेत.
Rokhthok






