● पालिका रणसंग्रामासाठी उमेदवारांचे लॉबिंग
सुनिल नाईक पाटील :
गेल्या अनेक वर्षांनंतर होऊ घातलेल्या वणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. “अभी नाही तो कभी नाही” अशा निर्धाराने अनेकांनी राजकीय रणसंग्रामात उतरायची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असून नेत्यांच्या घरासमोर उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत. Local body elections: Crowd of aspirants at the doors of leaders!
पालिका निवडणुकीची चाहूल लागताच स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्याशी संपर्क वाढविण्यास इच्छुकांनी सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर ‘सेटिंगबाजी’ आणि ‘लॉबिंग’ची चढाओढच दिसून येत आहे. गुलाबी थंडीत राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
यावेळी उमेदवारांची निवड स्थानिक नेते तसेच पक्षातील वरिष्ठांच्या मंजुरीनेच होणार असल्याने प्रत्येक इच्छुक वरिष्ठांच्या गाठीभेटींमध्ये व्यस्त आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला असे आरक्षित असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे मात्र उपाध्यक्ष पद पदरी पडावं याकरिता आता रणनीती आखल्या जात आहे.
मागील कार्यकाळात वणी नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. 26 पैकी तब्बल 22 नगरसेवक भाजपचे तर चार अपक्ष होते. इतर पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. मात्र यावेळी समीकरणे वेगळी आहेत. शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षाची भूमिका निर्णायक राहणार आहे.
राजकीय पातळीवर होणाऱ्या हालचालींनी शहरात चैतन्य निर्माण झाले आहे. भाजप विरोधकांच्या रणनीती कडे लक्ष ठेवून आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. परंतु मविआतील घटक पक्ष काँग्रेसला विश्वासात घेतले का, हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच आगामी निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून महायुती व आघाडीत आलबेल आहे असे दिसत नाही.
ROKHTHOK






