● गाडी जाळली, कार्यालयाची तोडफोड
● चोप देण्याचे कारण गुलदस्त्यात
Big News | महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद शाळा बेलोरा येथील प्रभारी मुख्याध्यापक पुरुषोत्तम बालाजी मंडलिक (44) यांच्यावर ग्रामस्थांनी अचानक हल्ला करून गंभीर मारहाण केली. चोप देण्याचे कारण गुलदस्त्यात असले तरी त्या शिक्षकांच्या तक्रारीवरून अकरा ग्रामस्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. चौकशीअंती आरोपींची संख्या वाढणार असून मारहाणीच्या खऱ्या कारणाचा छडा पोलिसांनी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. Teacher attacked, eleven villagers charged with crime
प्रभारी मुख्याध्यापक मंडलिक हे यवतमाळ येथून सकाळी सहा वाजता आपल्या ड्रीमयुगा (क्र. MH 29 AF 3868) मोटार सायकलने बेलोरा येथे पोहचले. शाळेत सकाळी 8 :30 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यावर, ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह काही ग्रामस्थांनी शाळेत येऊन कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्याबद्दल वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
काही वेळातच ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत मंडलिक यांना जाब विचारला व लाथाबुक्यांनी, लाकडी स्केलने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व कानाजवळ गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांच्या कार्यालयातील संगणक, खुर्च्या आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली. त्यांची मोटारसायकल देखील पेटवून दिल्याचे स्पष्ट करत सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
प्रभारी मुख्यध्यापक मंडलिक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेलोरा येथील ग्रामस्थांवर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 118 (1), 121 (1), 132, 189 (1), 189 (2), 190, 191 (2), 324 (4), 326 (क) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी आरंभली असून आरोपींच्या संख्येत वाढ होणार असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.
● त्या शिक्षकालाच का बदडले..!
शाळा व्यवस्थापन समिती ने काही दिवसांपूर्वी त्या शिक्षकांबाबत शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. त्यात विद्यार्थ्यांशी असभ्य, गैरवर्तन व विद्यार्थिनीशी वागणूक संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या शिक्षकाचा नेमका दोष काय ? ग्रामस्थांचा रोष का उफाळून आला याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rokhthok News






