● शेतकऱ्यांच्या व्यथांना कोण देणार न्याय ?
Sad News :
देशभरात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साजरे होत असतानाच वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्या. एका बाजूला गावात झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत होता, ही वास्तविकता समोर येताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Two farmers ended their lives by consuming poison
राजकुमार मारोती गोवारदीपे (55) राहणार नवरगाव (सैदाबाद) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. दिनांक 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजता त्यांनी आपल्या घरीच विषारी द्रव प्राशन केले. ही बाब घरच्यांना कळताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व दोन लहान नातवंडे असा आप्तस्वकीय परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत कळमना (बु.) येथील निवासी सहदेव विश्वनाथ बोबडे यांनी स्वातंत्र्यदिनी सायंकाळी सहा वाजता आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. त्यांनी विष प्राशन करताच त्यांना तात्काळ उपचारासाठी वणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा मोठा परिवार आहे.
शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी संकटात असल्याचे अधोरेखित होत आहे. शेती हा देशाचा कणा मानला जातो, पण तोच कणा तुटताना दिसत आहे. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Rokhthok






