● समाजमाध्यमावर व्हिडीओ प्रसारित केल्याचा प्रकार..पत्रकारांची पोलिसात धाव…
ROKHTHOK : सुमारे चार वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ परवानगीशिवाय सोशल मीडिया व विविध ग्रुपमध्ये प्रसारित करून बदनामी केल्याचा गंभीर आरोप एका पत्रकाराने केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, पोलिसांनी चक्क… दारूबंदी अधिकारी संजय बोडेवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. यामुळे अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा पुन्हा उजागर झाला आहे. A case has been registered against that…prohibition officer…!
पत्रकार निलेश चौधरी यांनी 11 ऑगस्टला पोलिस निरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे चार वर्षांपूर्वीचा त्यांचा एका मित्रासोबतचा वैयक्तिक व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय संबंधित व्यक्तींच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रसारित अथवा शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ अशा पद्धतीने प्रसारित झाल्याने आपल्या वैयक्तिक व सामाजिक प्रतिमेला धक्का बसला असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. दारूबंदी अधिकारी नेमके बोडेवार की बोडेकर हा प्रश्न अधांतरी आहे.
याप्रकरणी पत्रकार म्हणून प्रतिष्ठेला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. व्हिडीओ नेमका कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आला, तो कोणकोणत्या व्यक्तींना पाठविण्यात आला आणि त्यामागे बदनामी करण्याचा हेतू काय ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, दारूबंदी अधिकारी यांच्या या प्रकारामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊन वैयक्तिक सुरक्षेबाबत भीती व चिंता निर्माण झाल्याचे पत्रकार निलेश चौधरी यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. भविष्यात आपल्या जीवितास अथवा मालमत्तेस कोणताही धोका किंवा अनुचित प्रकार घडल्यास या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून न थांबता व्हिडीओ कोणी, कधी, कोणत्या माध्यमातून आणि कोणकोणत्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रसारित केला, याचा डिजिटल तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक ते डिजिटल पुरावे संकलित करून दोषी व्यक्तीची भूमिका स्पष्ट करावी, असेही तक्रारीत नमूद आहे.
चौकशीत बदनामी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच तक्रारदाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकार निलेश चौधरी यांनी केली आहे.
या तक्रारीमुळे वैयक्तिक व्हिडीओच्या परवानगीशिवाय प्रसाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या चौकशीत या व्हिडीओच्या प्रसारामागील नेमके कारण आणि संबंधितांची भूमिका काय समोर येते, याकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.






