Home Breaking News उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळणार गती

उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळणार गती

● प्रलंबित मोबदला, जमीन संपादनासह विविध प्रश्नांवर कार्यवाहीचे निर्देश, वेकोली सिएमडींची प्रत्यक्ष पाहणी...

C1 20260816

प्रलंबित मोबदला, जमीन संपादनासह विविध प्रश्नांवर कार्यवाहीचे निर्देश, वेकोली सिएमडींची प्रत्यक्ष पाहणी…

ROKHTHOK : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उकणी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. वेकोलिचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी बुधवारी 12 ऑगस्टला उकणी गावाला भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन अद्याप संपादन न झालेल्या शेतीची पाहणी केली. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेत. The issue of Ukani rehabilitation will gain momentum.

उकणी गावाचे पुनर्वसन, मोबदला आणि जमीन संपादनाच्या प्रश्नांसाठी ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षांत विविध आंदोलने केली आहेत. कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनेही सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सीएमडींच्या प्रत्यक्ष भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजता डॉ. हेमंत पांडे यांनी सहकाऱ्यांसह उकणी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसा खाणीत होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे, परिसरातील प्रदूषण तसेच उर्वरित जमीन संपादनाचा प्रश्न सीएमडींच्या निदर्शनास आणून दिला.

Img 20250103 Wa0009

यानंतर डॉ. पांडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन अद्याप संपादित न झालेल्या शेतीची पाहणी केली. प्रलंबित जमीन संपादनासह इतर प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित वेकोलि अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता उकणी गावाचे सुरक्षित व योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.

170 शेतकऱ्यांची जमीन अद्याप प्रलंबित

उकणी खंड-1 परिसरातील सुमारे 15 टक्के जमीन अद्याप संपादित झालेली नसून, सुमारे 170 शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. तसेच घरांसाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने त्याचे फेरमूल्यांकन करून बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा : संजय खाडे

“सीएमडी” यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. संघर्ष समिती आणि उकणीवासीयांच्या वतीने त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळेल आणि लवकरच आमच्या मागण्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया कामगार नेते संजय खाडे यांनी व्यक्त केली.

यावेळी कामगार नेते व एचएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव, संजय खाडे, अर्जुन खापणे, विवेक धांडे, कुणाल बोंजे, सागर डांगे, कवडू पचारे, सुहास डाहुले, त्रिकाल ढापकस, अशोक गोवारदिपे, अक्षय ढापकस यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य, उकणीवासी आणि वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleठाणेदारांच्या तपास कौशल्याची दखल
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.