● स्वातंत्र्यदिनी झालेला गौरव संतोष मनवर यांच्या कर्तव्यनिष्ठेची पोचपावती…
Rokhthok : जिल्ह्यातील मोहदा येथील ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले होते. 97 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या पथकाने आरोपींचा माग शोधून काढत 64 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला तर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. Recognition of the investigative skills of the Thanedars
मोहदा येथील ज्वेलरी दुकानातील चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी मनवर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी पारंपरिक तपासासोबतच तांत्रिक माहिती, गुप्त बतमीदारांचे नेटवर्क आणि तपासपद्धतीचा प्रभावी वापर करण्यात आला. अहोरात्र तपास करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि अखेर पुणे येथून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या धडक कारवाईत 64 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने तपास पथकाचे विशेष कौतुक होत आहे.
संतोष मनवर यांनी पोलीस दलात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुन्हेगारांवर वचक, गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास, तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांचा हातखंडा आहे. जिल्ह्यातील गोपनीय बातमीदारांचे जबर नेटवर्क यामुळे त्यांनी अनेक गुन्ह्याची उकल शिताफीने केली आहे. यामुळेच स्वातंत्र्यदिनी झालेला गौरव त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि धडाडीच्या पोलिसी कामगिरीची पोचपावती ठरली.






