● माजी आमदाराने लगावला खोचक टोला
Political News : “नमो उद्यान” प्रकल्पाचे भूमिपूजन पालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपने केले होते. प्रोटोकॉल चा विषय पुढे करून विद्यमान आमदार व शिवसैनिकांनी पुन्हा भूमिपूजन केले. दरम्यान भाजपने लावलेले फलक तोडण्यात आले. हे कृत्य शिवसैनिकांनी केलेच नाही असा युक्तिवाद विद्यमान आमदारांनी केला. यावर टिपण्णी करताना शिवसैनिक शब्द फिरवत नाही, फलक तोडणारे समाजकंटकच..! असा खोचक टोला माजी आमदाराने लगावला. Former MLA made a sharp remark

आनंद नगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्यान’च्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम तिसऱ्यांदा शनिवारी पार पडला. बँड-बाजाच्या गजरात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व आनंद नगर परिसरातील जेष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथमतः भाजपने भूमिपूजन करताना लावलेले फलक तोडण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले. आजी-माजी आमदारांत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत. विकासाचा मुद्दा गौण ठरतो की काय असे वाटायला लागले आहे. शहराचा सर्वांगीण, शाश्वत विकास महत्वाचा आहे. याकरिता आजी-माजी आमदारांनी समन्वय साधून विकासात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे.
फलक तोडल्यामुळे भाजप आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहे. मानसिक विकृतीचे दर्शन घडल्याचा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. फलक तोडल्यानंतर हे कृत्य शिवसैनिकांनी केलेच नाही असा युक्तिवाद करण्यात येत आहे. यावर बोलतांना बोदकुरवार यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, शिवसैनिक शब्द फिरवत नाही, जे केले त्यावर ठाम असतात. फलक तोडणारे समाजकंटकच असावेत अशी उपहासात्मक टिपण्णी केली.
‘नमो उद्यान’ प्रकल्पाची सध्यस्थीतीत सुरू असलेली राजकीय धुळवड शहरात चर्चेचा विषय आहे. आजी-माजी आमदारांमधील वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर येत आहे. एका उद्यानाच्या फलकावरून सुरू झालेला वाद आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून, शहरातील राजकारणात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Rokhthok






