Home Breaking News मनसेचा आक्रमक पवित्रा, प्रशासन हादरले

मनसेचा आक्रमक पवित्रा, प्रशासन हादरले

● दूषित पाण्यावरून रणकंदन, पंचायत समितीवर धडक, चौकशी समिती तातडीने गठीत

C1 20260516

दूषित पाण्यावरून रणकंदन, पंचायत समितीवर धडक, चौकशी समिती तातडीने गठीत

Rokhthok | तालुक्यातील खंडणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना दूषित, गढूळ व लाल-पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत मारेगाव पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीने चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. MNS’s aggressive stance, administration shaken

खंडणी गावातील नागरिकांना दीर्घकाळापासून अत्यंत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विविध आजारांचे प्रमाण वाढल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. एकीकडे पाण्याचा अपुरा उपसा आणि दुसरीकडे आरोग्यास घातक ठरणारे पाणी, अशा दुहेरी संकटात ग्रामस्थ सापडले आहेत.

याशिवाय, 15 व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर साहित्य खरेदी व विविध बांधकामांच्या कामांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिले उचलण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एकही ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच पेसा योजनेअंतर्गत प्राप्त निधीचा खर्च, खाते, पासबुक व पेसा सदस्य निवडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

Img 20250103 Wa0009

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पंचायत समिती कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान राजू उंबरकर यांनी दूषित पाण्याची बाटली ग्रामसेवकाच्या हातात देत “हे पाणी पिऊन दाखवा” असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावात दोन दिवसांत नवीन बोरवेल खोदून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. खंडणी गावातील नागरिकांच्या नळाला शुद्ध पाणी येईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.
बातमीदार