● युवासेना आक्रमक, त्याप्रकरणी थेट तपासावरच आक्षेप…..
Wani News :
शहरातील पंचशील नगर येथे 8 डिसेंबरला उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणाने आता गंभीर आणि खळबळजनक वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासावर थेट बोट ठेवत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी वणी पोलीस प्रशासनावर तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. Serious allegations of collusion with tobacco mafia
घटनेच्या दिवशी, जागरूक नागरिकांनी 112 आपत्कालीन क्रमांकावर दिलेल्या माहितीवरून पंचशील नगर येथे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची खेप पकडण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असतानाही, प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन (MH-24-BL-7051) आजतागायत जप्त न होणे ही बाब संशयास्पद असल्याचे शेंडे यांनी स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष साक्षीदार, वाहन चालक व मालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध असतानाही एक महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही वाहनावर कारवाई न होणे म्हणजे आरोपींना वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तपासातील हा “अर्थपूर्ण विलंब” तस्करीमागील आर्थिक साखळी आणि मुख्य सूत्रधार उघड होण्यास अडथळा ठरत असल्याचा आरोप सुद्धा निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित वाहन तात्काळ जप्त करून मालक व चालकावर कठोर कारवाई करावी, FDA ने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करावी, तपासात दिरंगाई करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे. अशा ठोस मागण्या युवासेनेने केल्या आहेत तर 48 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे.
शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा खुलेआम विकल्या जातोय, तो नेमका येतो कुठून, कोण आहे तस्कर, याबाबत पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाला इत्यंभूत माहिती आहे. मात्र कारवाईचा फास आवळताना कठोर कायद्याची अंमलबजावणी होत नाही. प्रतिबंधित तंबाखूची विक्री हा केवळ नियमभंग नसून तो मानवी जीविताला धोका पोहोचवणारा गंभीर गुन्हा आहे. मात्र non-bailable गुन्हे का नोंदविण्यात येत नाही हे आकलनाच्या पलीकडे आहे.
Rokhthok






