● स्विफ्ट डिझायरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
ROKHTHOK : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळच्या पथकाने घाटंजी शहरात कारवाई करत बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. या कारवाईत दोन धारदार तलवारी आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 4 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Criminal arrested in with sharp sword
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर हे आपल्या पथकासह पांढरकवडा उपविभागात अवैध धंद्यांवर कारवाई व फरार आरोपींच्या शोधार्थ पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घाटी बेघर घाटंजी येथील सराईत इसम अनिल उत्तम जाधव (29) हा घातक तलवारी घेऊन खापरी नाका परिसरात येळाबारा मार्गावरील रस्त्यावर आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये थांबला आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ खापरी नाका परिसरात सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर कारला वेढा घातला. यावेळी वाहनाची झडती घेण्यात आली. कारच्या डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यात लपवून ठेवलेल्या दोन धारदार लोखंडी तलवारी आढळून आल्या. तलवारी गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या.
कारवाईदरम्यान दोन तलवारींसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 4 लाख 52 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी आणि चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
टीप: मूळ फोटो ओरिजिनल आहे, चांगल्या सादरीकरणासाठी AI इमेजचा वापर करण्यात आला आहे.






