● बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश
● 2 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत मोठे घबाड मिळाले असून लाखो रुपयांची बनावट दारु, कच्चा माल व दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर घटना बुधवारी उघडकीस आली असून खरा म्होरक्या पसार झाला तर तेथे काम करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. Excise department takes strong action
शहरालगत असलेल्या लालगुडा शिवारात एका आलिशान दुमजली घरात बनावट दारूचा कारखाना बिनधास्त सुरू होता. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. सविस्तर माहिती संकलित केल्यानंतर एका दुमजली घरावर नियोजनबद्ध धाड टाकली.
यावेळी पथकाला घरातील लाकडी दिवाण व आलमारी मधून रूपेश संत्रा ब्रँडचे नकली स्टिकर लावलेल्या देशी दारूच्या 90 मिलीच्या तब्बल 36 प्लास्टिक पिशवीत भरलेल्या 3600 निप, किंमत तब्बल 1 लाख 62 हजार रुपयांची बनावट दारू शिवाय घराला लागून असलेल्या एका टिनाच्या शेडमधून रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बॉटल, प्लास्टिक ड्रम, दोन बाईक एक मोपेड व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी घरात झाडाझडती घेतली असता लाकडी दिवाण मध्ये लपून बसलेल्या एका युवकाला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने सदर नकली दारूचा कारखाना हा श्याम भरत मेश्राम यांचा असल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या युवकाने आपले नाव सूरज लोडे, रा. वेळाबाई असे सांगितले. मात्र बनावट दारू कारखान्याचा मालक शाम मेश्राम हा आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे.
सदर कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा पी. एस. बोढारे, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक डी. एस. त्रिपाठी, उप निरीक्षक एस. एल. बोढेवार, एस.एम. बुटले, व भरारी पथक यवतमाळ येथील उप निरीक्षक डी. डी. वाळके व सहकाऱ्यांनी केली. बातमी लिहेपर्यंत पथकाची कारवाई सुरु होती.
Rokhthok






