Home क्राईम दोन चोरटे गजाआड, पाच दुचाकी हस्तगत

दोन चोरटे गजाआड, पाच दुचाकी हस्तगत

882

वणी पोलिसांची कारवाई

रोखठोक | शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. पोलिसांनी सुद्धा चोरट्यांचा छडा लावण्याचा विडा उचलला आहे. शनिवार दि. 28 जानेवारीला दीप्ती टॉकीज परिसरात चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत पाच दुचाकी व मोबाईल संच असा 1लाख 95 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

मोहम्मद अब्दुल कादीर थैम (26) धंदा मोटर मॅकॅनिक, हनुमान वार्ड वरोरा व रंजीत रंगराव किनाके (25) रा. कॉलरी वार्ड वरोरा जि. चंद्रपूर असे अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. शनिवारी ते दोघे चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली.

ठाणेदारांनी तातडीने पोलीस पथकाला दीप्ती टॉकीज परिसरात रवाना केले. काळसर रंगाच्या बजाज प्लॉटीना मोटर सायकल जवळ ते दोघे उभे होते. त्याना ताब्यात घेत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटकेतील आरोपींच्या ताब्यातून तब्बल पाच मोटार सायकल व दोन मोबाईल संच हस्तगत करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ संजय पूजलवार, ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, विठल बुरूजवाडे, हरीन्द्रकुमार भारती, संतोष अढाव, पुरूषोत्तम डडमल यांनी केली.
वणी: बातमीदार