
● चिल्लर विक्रेतेच झालेत “होलसेलर”!
● उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणा गाफील
BIG NEWS :
वणी तालुक्यासह उपविभागात अवैध दारू विक्रीने कळस गाठला असून चक्क किरकोळ विक्रेते आता “होलसेलर” झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. हजार–दीड हजार लोकवस्तीच्या गावात दररोज पन्नास ते साठ पेट्या दारूची विक्री होत असल्याने सुज्ञ नागरिकांचे डोके चक्रावले आहे. मात्र, या खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याकडे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. A flood of illegal liquor is flowing in the subdivision.
वणी तालुक्यातील शिंदोला परिसरात देशी व विदेशी दारू सहज आणि सर्रास उपलब्ध होत असून दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना अवैध विक्रेत्यांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिंदोला गावात तर ऐन चौकात टिनाच्या शेडला चक्क बिअर बारचे स्वरूप आले असून कायद्याची पायमल्ली उघडपणे सुरू आहे.

बिनधास्त आणि राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या साम्राज्यातून “बाप-लेक” अवैध ‘लिकर किंग’ म्हणून परिसरात ओळखले जात आहेत. याच परिसरात काही अंतरावर ‘संगीता’च्या तालावर ‘मोठ्या’ प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूचा पुरवठा सुरू असून, नेमका हा दारूचा साठा कोण पुरवत आहे, हे उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाला सर्वस्वी माहिती असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कारवाई कोण करणार? हा प्रश्न आता संशोधनाचा विषय ठरत आहे.
तालुक्यातील कायर, घोंसा, राजूर, चारगाव, शिरपूर, आबई फाटा तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अवैध दारूने थैमान घातले आहे. उत्पादन शुल्क विभागाचा मनमानी व संशयास्पद कारभार नजरेआड करता येणार नाही. नव्यानेच उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचेकडे उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आली आहे. परिसरातील महिलांचं दुःख त्या समजू शकतात मात्र स्थानिक पातळीवर अवैध दारू विक्रेते संबंधित अधिकाऱ्यांना दरमहा विहित ‘रसद’ पुरवत असतील तर त्या सुद्धा काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, तसेच नियमांना हरताळ फासणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे दारूविक्री परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा, कायद्याचा धाक संपुष्टात येऊन अवैध धंदे आणखी बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी व नवनियुक्त उपमुख्यमंत्री याप्रकरणी कठोर निर्णय घेतील अशी अपेक्षा स्थानिक नागरिक वर्तवत आहेत.
ROKHTHOK






