● जागतिक पृथ्वी दिनानिमित्त दुर्मिळ शोध
● हत्ती, बायसन, हरिणासह पाषाणयुगीन अवजारे सापडली
BIG NEWS : जागतिक पृथ्वी दिनाच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद संशोधन समोर आले आहे. तालुक्यातील जुगाद व आपटी परिसरात वर्धा नदीच्या काठावर तब्बल 20 हजार वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ जीवाश्मांचा खजिना सापडला असून, यात हत्ती, बायसन, हरिण, रानडुक्कर यांच्यासह मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारांचाही समावेश आहे. A treasure trove of fossils dating back thousands of years was found in the taluka!
भूशास्त्र व पुरातत्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या संशोधनातून हा महत्त्वाचा शोध लागला आहे. प्लेइस्टोसीन (हिमयुगीन) काळातील हे जीवाश्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे एकत्रित जीवाश्म आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संशोधनात सर्वाधिक प्रमाणात बायसन (गौर) या प्राण्यांचे जीवाश्म आढळले आहेत. त्याशिवाय रानडुक्कराचे दात, हरिणाची हाडे, तसेच काही मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनेही मिळाली आहेत. हे सर्व अवशेष प्रा. चोपणे यांच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
पाषाणयुगीन मानवांनी या प्राण्यांची शिकार केली असल्याचे या अवजारांवरून स्पष्ट होते. सुमारे 20 हजार वर्षांपूर्वी हिमयुग संपल्यानंतर झालेल्या प्रचंड पूरामुळे हे प्राणी वाहून जाऊन गाळात गाडले गेले आणि कालांतराने त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी प्रसिद्धी पत्रातून दिली.
वणी तालुका हा भूशास्त्र आणि जीवाश्मांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, येथे 200 कोटी वर्षांपासून ते अलीकडील 20 हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म सापडले आहेत. यात स्ट्रोमॅटोलाईट, वृक्ष, पाने, डायनासोर तसेच विविध सागरी जीवांचे अवशेषही समाविष्ट आहेत.
शासकीय संग्रहालयाची गरज अधोरेखित
अशा दुर्मिळ आणि ऐतिहासिक जीवाश्मांच्या जतनासाठी वणी-चंद्रपूर परिसरात शासकीय संग्रहालय उभारण्याची गरज प्रा. चोपणे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून विसापूर येथे भौगोलिक संग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
● 25 वर्षांची संशोधन परंपरा
प्रा. सुरेश चोपणे हे 1995 पासून भूशास्त्रीय संशोधनात कार्यरत असून, त्यांनी डायनासोर, स्ट्रोमॅटोलाईट, वृक्षांचे जीवाश्म अशा अनेक महत्त्वपूर्ण शोधांची नोंद केली आहे. त्यांच्या या नव्या संशोधनामुळे वणी आणि यवतमाळ जिल्ह्याचे नाव देशाच्या भूशास्त्रीय नकाशावर अधिक ठळकपणे उमटले आहे. वणी तालुक्यात सापडलेली ही जीवाश्मे केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची ठरत असून, भविष्यात संशोधन, पर्यटन आणि शैक्षणिक दृष्टीनेही हा परिसर केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ROKHTHOK






