
● राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
Political News :
महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो आणि नाव यवतमाळ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून ‘गायब’ असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्याची शासकीय वेबसाईट (yavatmal.nic.in) वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची प्रतिमा व नाव नसल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. Forgetting protocol, Deputy Chief Minister Sunetra Pawar “disappears” from the website
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष सुनयना संजय येवतकर (अजात) तसेच शहराध्यक्ष अबोली देशमुख यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना निवेदन देण्यात आले. “ही केवळ तांत्रिक चूक नसून शासनाच्या प्रोटोकॉलचा अवमान आहे,” असा घणाघाती आरोप करत संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.

महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्याच्या अधिकृत संकेतस्थळांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा व नावे असणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत एका उपमुख्यमंत्र्यांचा फोटो व नाव न दर्शविणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. “जिल्हा प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करून संकेतस्थळ अद्ययावत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी सुनयना येवतकर, अबोली देशमुख यांच्यासह संध्या वानखडे, करुणा भबुतकर, मनोज भबुतकर, शितल घावडे, मालती गावंडे, कांता लाहे, जया पाटील, राधिका राठोड आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शासनस्तरावरून याची दखल घेतली जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Rokhthok






