● विश्वास नांदेकर उतरले मैदानात
Political News :
वणी शहरातील जनतेवर नगर परिषदेने लादलेल्या अवाजवी व पाशवी करांविरोधात आता थेट माजी आमदार, शिंदेसेनेचे नेते विश्वास नांदेकर मैदानात उतरले आहे. पालिकेने जनतेच्या छातीवर कराचा बडगा उगरल्याने जनतेने कर भरू नये असा इशारा देण्यात आला आहे. या तुघलकी कारभराविरोधात सोमवार दिनांक 29 सप्टेंबरला पालिकेवर जनआक्रोश मोर्चा धडकणार असून करपावत्यांची होळी करून उपस्थित नागरिक आपला संताप व्यक्त करणार आहेत. Tax burden on the people, public anger against the municipality
मागील काही वर्षांपासून वणी नगर परिषदेत सुरू असलेली अनागोंदी, भ्रष्टाचार आणि निधीचा उघड उघड अपव्यय यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लोकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र वर्षानुवर्षे ठप्प आहे. नागरिकांना अजूनही ब्लिचिंग व आलम पावडर मिसळलेले अस्वच्छ पाणीच प्यावे लागते. परिणामी किडनीचे आजार, त्वचारोग इत्यादी आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
याकडे पूर्ण दुर्लक्ष करून नगरपरिषद प्रशासकांनी नागरिकांवर कराचा डोंगर लादला आहे. शिवाय हद्दवाढ करून निवडक बिल्डर्स–कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्याची योजना राबवली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी विश्वास नांदेकर यांनी केला आहे. तिजोरी रिकामी असूनही “हद्दवाढीचा” घाट घालण्यामागे लाखो-कोट्यवधींचा फायदा काही मोजक्या मंडळींना करून देण्याचा डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात माजी आमदार व चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “जनतेने हा कराचा भरणा करु नये. लढा उभा राहिल्याशिवाय अन्याय थांबणार नाही,” असा इशारा दिला. आगामी आंदोलनातून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. याप्रसंगी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, संदीप वाघमारे, महेश चौधरी, अनिल उलमाले यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.
Rokhthok






