● महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींचे स्नेहमीलन
Wani News :
शालेय व महाविद्यालयीन जीवनात जडलेली मैत्री काळाच्या ओघात दुरावते. शिक्षण, नोकरी, संसार यामध्ये अनेकजण एकमेकांपासून दूर जातात. मात्र, मैत्रीच्या नात्याला काळाचं बंधन नसतं, हे वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सन 2000 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले. तब्बल 25 वर्षांनंतर हे सर्व मित्र-मैत्रिणी एका स्नेहमिलन सोहळ्यात पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. Friendship has no time limit.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकताच हा स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जणू एखाद्या लग्न समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी बँड पथक, फुलांच्या वर्षावात माजी विद्यार्थ्यांचे स्वागत, वाजत-गाजत सभागृहात प्रवेश अशी भव्य व्यवस्था करण्यात आली होती.

उद्घाटनानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गीत गायन, कविता वाचन, नृत्य, विविध खेळ यांमधून सर्वांनी आनंद लुटला. जुने वर्ग, ग्रंथालय आणि महाविद्यालयाचा परिसर पाहताना अनेकजण भावूक झाले. “25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येऊन तीच मैत्री अनुभवता आली,” अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी, “महाविद्यालयात प्रथमच असा भव्य स्नेहमिलन सोहळा होत असून, ही मैत्रीची परंपरा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे सांगितले. यावेळी आठवणींना उजाळा मिळाल्याने माजी प्राचार्यांचे डोळे पाणावले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्रा. अनिल हुड, प्रा. सुधारक रेड्डी, डॉ. अजय देशपांडे, सहसचिव अशोक सोनटक्के, डॉ. संदीप तुंडूरवार, डॉ. शंकर वऱ्हाटे, डॉ. रेखा पवार, डॉ. अभिजित अणे, प्रा. उमेश व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी केले. प्रास्ताविक प्रविण खानझोडे व वैशाली पाटील यांनी संयुक्तरित्या मांडले, तर आभार गोपाल गव्हाणे यांनी मानले. या स्नेहमिलन सोहळ्यामुळे जुन्या मैत्रीला नवे बळ मिळाले असून, सहभागी सर्वांच्या आयुष्यात हा दिवस कायमचा संस्मरणीय ठरला.
Rokhthok






