● शिवतीर्थावर अवतरणार शिवकाळ
Rokhthok |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त वणी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, 6 मार्च रोजी शिवतीर्थावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, शहरात सर्वत्र शिवकालीन वातावरण अनुभवायला मिळणार आहे. Historic celebration of Shiv Jayanti in Wani
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून यंदाचा उत्सव अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात साजरा होणार आहे. वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती, भक्कम तटबंदी आणि भव्य महाद्वारांमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. कलाकार रात्रंदिवस परिश्रम घेऊन देखावे साकारत असून, पाचही प्रमुख मार्गांवर आकर्षक रोषणाई व सजावट केली जात आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेकाने होणार असून त्यानंतर सामूहिक महाआरती संपन्न होईल. पुतळ्यावर फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्तांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. दिवसभर शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे, प्रेरणादायी गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
सायंकाळी राज्यभरातील नामांकित ढोल-ताशा पथकांच्या वादनाने वातावरण दुमदुमून जाणार असून, भव्य फटाक्यांची आतिशबाजी हा सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. यंदा अत्याधुनिक लेझर लाईट शोच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असून, विशेष तंत्रज्ञानाद्वारे युद्धप्रसंग जिवंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उत्सव अधिक आकर्षक करण्यासाठी ‘रिल्स स्पर्धेचे’ही आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. वणी व परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. वणीमध्ये तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंती उत्सवामुळे शहरात शिवभक्तीचा जागर अनुभवायला मिळणार असून, 6 मार्च रोजी सायंकाळी शिवतीर्थावर शिभक्तांनी मोठया उत्साहात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी : बातमीदार






