●आबई फाट्या जवळील भीषण दुर्घटना
Wani News :
वणी तालुक्यातील आबई फाटा परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण ट्रकसह कोळसा जळून खाक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा भरून वर्धा येथे निघालेला ट्रक क्रमांक MH-40-CM-5471 शनिवारी मार्गस्थ असताना रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. A massive fire gutted the entire truck, along with coal.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या सायलेंसरमधून ठिणगी उडाल्याने किंवा उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक तात्काळ रस्त्याच्या कडेला उभा केला व स्वतःची सुटका करून घेतली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
मात्र काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण ट्रक व त्यातील कोळसा भस्मसात केला. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. या घटनेत लाखो रुपयांचा कोळसा व वाहनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शींनी शिरपूर पोलिसांना तातडीने सूचना दिली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जात आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
Rokhthok






