
● अल्पवयीन मुलांची सुरक्षितता गरजेची
ROKHTHOK | शहरातील शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या एका संवेदनशील प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजात अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. हा काय प्रकार…समाज अधोगतीला जातोय का? अल्पवयीन मुलाला अश्लील व अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचे उघड झाल्याने परिवार पुरता हादरला आहे. What kind of society is this… going downhill..!
माहितीनुसार, शास्त्रीनगर परिसरात राहणारे एक कुटुंब रात्री घरी झोपलेले असताना त्यांच्या अल्पवयीन मुलासोबत अयोग्य प्रकार घडल्याची बाब उघडकीस आली. मुलाच्या वर्तनात बदल जाणवल्याने पालकांनी त्याच्याशी संवाद साधला असता, परिसरातील एका व्यक्तीने त्याला यापूर्वी अश्लील व अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचे त्याने सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पालकांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आकाश उर्फ अक्षय अरुण वांढरे (30) रा. शास्त्रीनगर, याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 65 (2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 5 (L)(M)(N), 6 व 10 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
वणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितास अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी करीत आहेत.
वणी : बातमीदार






